‘या’ दिवशी होणार बहुचर्चित ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ प्रदर्शित
‘हॅशटॅग तदेव लग्नम’ हे नाव ऐकूनच जरा विचारात पडला असाल ना? हॅशटॅग हा आजचा ट्रेंडिंगमधला शब्द आहे तर तदेव लग्नम हा संस्कृत शब्द त्यामुळे या दोघांचा परस्परांशी काय संबंध आहे? असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना सतावत असतील. हीच उत्सुकता कायम ठेवत, हा भन्नाट विषय घेऊन तरुणाईला आणि त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून येत्या ४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
शुभम फिल्म्स प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटामध्ये सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची प्रमुख भूमिका असून या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांनी केले आहे. या चित्रपटाचे शेखर विठ्ठल मते निर्माते आहेत.
मोशन पोस्टर पाहून यात लग्नातील धमाल पाहायला मिळणार आहे, हे कळतेय. परंतु आता हे ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ नेमके काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ४ ऑक्टोबर पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान हे प्रथमच एकत्र येत आहेत. त्यामुळे या चित्रपटात काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार हे नक्कीच!
चित्रपटाबद्दल निर्माते म्हणतात, ” एका परिपक्व नातेसंबंधावर बेतलेली ही गोड कथा आहे. आपल्यापैकी अनेकांना ही कथा स्वतःच्या आयुष्याशी मिळतीजुळती वाटेल. चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, तांत्रिक बाबी या सगळ्याच जमेच्या बाजू आहेत. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट आहे.”
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आनंद गोखले म्हणतात, ” तदेव लग्नम “ ज्यांचा भावार्थ अर्थ असा की, तेच हे एकत्र येणे.
आता हेच शीर्षक या चित्रपटासाठी का, हे जाणून घेण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता एवढेच सांगेन की, हा एक धमाल चित्रपट आहे.”