“शिवामुळे साडी आणि हिल्स मध्ये फाईट करण्याचा अनुभव लाभला !” – पूर्वा कौशिक
‘शिवा’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या हृदयात घर केले आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडताना दिसत आहे. शिवाची स्टाईल घरा-घरात प्रसिद्ध झाली आहे मग तो शिवाचा शर्ट-पॅन्ट आणि बॉयकट असो किंवा लग्नानंतरचा साडीचा लुक असो. आता काय तर शिवाची साडी मध्ये फाईट सीनची सर्वत्र चर्चा होतं आहे. शिवा म्हणजेच पूर्वा कौशिकने साडी मध्ये फाईट सीन शूट करण्याचा अनुभव व्यक्त केला,
*”साडी मध्ये फाईट सीन करण्याचा अनुभव खूप कमाल होता. मी आयुष्यात पूर्वा म्हणून हे करीन असं मला कधीच वाटलं न्हवत पण ह्या मालिकेच्या निमित्ताने मला हे सर्व करायला मिळालं ह्याबद्दल खरंच आनंद आहे. तशी मालिकेत शर्ट-पॅन्ट मध्ये छोट्या-मोट्या मारामाऱ्या केल्यात, पण जेव्हा साडी मध्ये फाईट सीन करायची चर्चा सुरु झाली तेव्हा थोडं दडपण आलं होतं कारण ते टीव्ही स्क्रीनवर प्रभावी आणि परिणामकारक दिसलं पाहिजे. माझ्यात ते हावभाव, देहबोली त्या पोशाखानुसार योग्य येईल का ह्याच टेंशन आलं होते.
जेव्हा हा सीन करायला केली तो अनुभव अविश्वसनीय होता. कुठच्याही कलाकाराच्या आयुष्यात असा क्षण त्याच्या अभिनयाच्या प्रवासात माईलस्टोन असतो आणि मला तो क्षण अनुभवायला मिळाला आहे. फाईट सीनच शूटिंग होतं असताना फाईट मास्टरचे मार्गदर्शन होतेच आणि सर्व गरजेची सावधगिरी घेऊनच आम्ही सगळं शूट करत होतो.
मला आधी वाटलं होतं की मी हे साडीत आणि हिल्सच्या सॅण्डलवर हे पेलवू शकीन का, शिवा नव्याने उभी राहायचा प्रयत्न करत आहे तर ती कशी दिसेल आणि ते अगदी जस हवं होतं तसंच झालं. मला तर हार्नेसची खूप गंमत वाटत होती. खरं सांगायच झाले तर जास्त सराव नाही करावा लागला आणि मार्गदर्शन करणारी माणसं ही उत्तम होती. “*
तेव्हा पाहायला विसरू नका ‘शिवा’ सोमवार ते शुक्रवार रात्री ९:०० वा फक्त आपल्या झी मराठीवर.