‘लैला मजनू’च्या प्यारवाल्या लव्हस्टोरीची चर्चा, रोमॅंटिक गाण्याला प्रेक्षकांची उत्तम साथ
आजवर इतिहासात असे अनेकजण आहेत जे जगावेगळे ठरत अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो वा रोमिओ ज्युलिएट…प्रेमाची परिभाषा या प्रेमीयुगुलांनी अत्यंत तत्परतेने मांडली. या प्रेमीयुगुलानंतर आता सर्वत्र आणखी एका जोडीची चर्चा सुरू आहे.
‘लैला मजनू’ या रोमँटिक गाण्यातून समोर आलेलं हे प्रेमीयुगुल साऱ्यांना वेड लावत आहे. गाण्याच्या थिरकायला लावणाऱ्या अशा बोलांनी आणि गाण्याच्या हटके चालीने साऱ्यांना भुरळ घातली आहे.
‘बिग हिट मीडिया’ने आजवर अनेक हिट गाणी सिनेरसिकांच्या मनोरंजनासाठी आणली आहेत. या गाण्यांच्या यादीत भर घालत ‘लैला मजनू’ हे नवकोर रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. एका छोट्याश्या गावातील मुलीला एक संधी देत सिनेविश्वाची झलक दाखवणारा कलाकार आणि त्या दोघांमध्ये हळुवार फुलत जाणार प्रेम या गाण्यातून पाहणं रंजक ठरत आहे.
या गाण्यात अभिनेता जगदीश झोरे आणि अभिनेत्री तनु भोसले यांच्यातील बहरणारं आणि नोकझोकवालं प्रेम पाहणं लक्षवेधी ठरत आहे.
‘बिग हिट मीडिया’च्या या नव्याकोऱ्या गाण्याची धुरा हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी सांभाळली आहे. तर संगीतकार म्हणून प्रशांत सातोसे याने बाजू सांभाळली आहे. इतकंच नव्हेतर प्रशांतने हे गाणं गायलं असून सोनाली सोनावणेने तिच्या आवाजाची जोड दिली आहे.
तर संपूर्ण गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा रोहित जाधवने योग्यरीत्या पेलवली आहे. गाणं प्रदर्शित होऊन एक दिवस झाला असून हे गाणं रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं असून अनेकजण या गाण्याला पसंती दर्शविताना दिसत आहेत.