‘तुला पाहून मी’ गाण्याचा रोमँटिक अंदाज ठरतोय लक्षवेधी, प्रेमीयुगुलांचीही पसंती
प्रेम ही जगाती सुंदर भावना आहे. आजवर जगात बऱ्याच प्रेमकथा अजरामर ठरल्याहेत. आणि अशा बऱ्याचश्या प्रेमकथांचे रूपांतर अनेक गाण्यांमधून रसिक प्रेक्षकांना अनुभवता आले. नवनवीन रोमँटिक गाणी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत आहेत.
सध्या अनेक प्रेमगीते ट्रेंडिंग सॉंग म्हणून प्रसिद्ध झाली आहेत. अशातच आता आणखी एका नव्या कोऱ्या रोमँटिक गाण्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘तुला पाहून मी’ असे बोल असणाऱ्या या गाण्याने साऱ्या प्रेमीयुगुलांना थिरकायला भाग पाडले आहे.
नवोदित कलाकार जोडी या गाण्यातून भेटीस आली आहे. गाण्यात दोघांची एकमेकांच्या भेटीसाठी सुरू असलेली चढाओढ तसेच एकमेकांना भेटता यावे म्हणून शोधून काढलेले अनेक पर्याय अशी आशयघन कथा या गाण्यातून पाहायला मिळत आहे. या गाण्यात अभिनेता विश्वास पाटील व अभिनेत्री मनीषा पोळेकर ही जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळत असून या जोडीचा रोमान्स पाहणं रंजक ठरत आहे.
‘केपी फिल्म्स एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘एसएसएम ग्रुप’ निर्मित आणि समृद्धी काळे सहनिर्मित ‘तुला पाहून मी’ हे गाणं साऱ्या तरुणाईला भुरळ घालत आहे. या गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा किशन पटेल साकारताना दिसत आहे.
तर हे सुंदर असं प्रेमगीत हृषी बी आणि सोनाली सोनावणे यांनी त्यांच्या सुमधूर स्वरात स्वरबद्ध केलं आहे. तर या गाण्याच्या संगीताची बाजू हृषी बी आणि विपुल शिवलकर यांनी सांभाळली आहे. संपूर्ण गाणं कोकणातील रत्नागिरी येथील समुद्र किनाऱ्यांवर चित्रित करण्यात आले आहे.