लवकरच जुळणार ‘अज्या’ची म्हणजेच नितीशची ‘सोयरीक’
झी मराठीवरील ‘लागिरं झालं जी’ मालिकेतून नितीश चव्हाण या अभिनेत्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याने मालिकेत साकारलेल्या अज्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. त्यानंतर नितीश कोणत्या मालिकेत पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. मात्र नितीश मालिकेत नाही तर रुपेरी पडद्यावर लवकरच झळकणार आहे. ‘सोयरीक’ असे त्याच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. या सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.
View this post on Instagram
१४ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमातून नितीश रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. या सिनेमाच्या मोशन पोस्टरमध्ये लग्नाचा मौसम दिसत असून एका साईडला नितीश उभा आहे तर दुसऱ्या बाजूला एक मुलगी पाठमोरी उभी आहे. नितीशसोबत कोणती अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
मकरंद माने लिखित-दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती ‘नाईंटीनाईन प्रॉडक्शन’ आणि ‘बहुरूपी प्रॉडक्शन्स’ने केली आहे. अजय गोगावले यांचे स्वरसाज या सिनेमातील गीतांना लाभला असून विजय गवंडे यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. छोट्या पडद्यावर यश मिळवणाऱ्या नितीशला रुपेरी पडद्यावरही यश मिळेल यात तिळमात्र शंका नाही.