एंटरटेनमेंटची डिलिव्हरी करायला येतोय ‘डिलिव्हरी बॉय’
‘डिलिव्हरी बॉय’चे पहिले पोस्टर भेटीला
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक गिफ्ट रॅप केलेल्या एका बॉक्समधून एक गोंडस बाळ बाहेर आल्याचे दिसत होते. त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता की डिलिव्हरी बॉय आणि या बॉक्सचा नेमका संबंध काय? तर प्रेक्षकांची ही उत्सुकता थोड्या फार प्रमाणात कमी होणार आहे. कारण आता ‘डिलिव्हरी बॉय’चे एक जबरदस्त पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून ते सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.
पोस्टरमध्ये एका आलिशान खुर्चीवर प्रथमेश परब विराजमान झालेला दिसत असून त्याच्या मागे अंकिता लांडे पाटील डॉक्टरच्या ऍप्रनमध्ये दिसत आहे. तर प्रथमेशजवळ पृथ्वीक प्रताप आहे. या पोस्टरमध्ये विशेष लक्षवेधी ठरत आहेत त्या आठ गरोदर बायका… त्यामुळे आता नेमके काय आहे हे प्रकरण, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ९ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे मोहसीन खान दिग्दर्शक आहेत. डेव्हिड नादर निर्माते असून फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, ” घेऊन येतोय एंटरटेनमेंटची डिलिव्हरी, अशी आमच्या चित्रपटाची टॅगलाईनच आहे. यावरून हा चित्रपट किती गंमतीशीर असेल, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. चित्रपट अतिशय मजेशीर आहे. तरीही त्यातून थोडासा सामाजिक प्रबोधन करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.”
निर्माते डेविड नादर म्हणतात, ‘’ चित्रपटाचा विषय खूप वेगळा आहे. या विषयाचे गांभीर्य घालवू न देता अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने तो मांडण्यात आला आहे. मला खात्री आहे, हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात नक्कीच यशस्वी होईल.’’