‘ठरलं तर मग’ नंतर अमित भानुशाली ‘फेसबुक गेम’ मधून येणार समोर !!
सध्या मराठी चित्रपटांची चलती असताना कुठेतरी सस्पेन्स थ्रिलर चित्रपट पुसट झालेले दिसत आहेत. सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचे प्रेक्षक सध्या अशा आगळ्या वेगळ्या कथेच्या शोधात आहेत. यातच भर घालत लवकरच नवा कोरा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज होत आहे. ‘फेसबुक गेम’ एक अनोखा खेळ? असा हा मर्डर मिस्ट्री असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास सज्ज होत आहे.
‘ललिता पवार प्रॉडक्शन फिल्म आर्ट’ प्रस्तुत आणि समीर पवार निर्मित, दिग्दर्शित ‘फेसबुक गेम’ या मर्डर मिस्ट्रीची कथा रंगवण्यासाठी मालिका विश्वाचा लाडका चेहरा, हँडसम अभिनेता अमित भानुशाली येणार आहे. ठरलं तर मग या मालिकेनंतर अमित ‘फेसबुक गेम’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे. फेसबुक या सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे हाताळत ही मर्डर मिस्ट्री रचण्यात आली आहे. सोशल मीडियाचे चांगले आणि वाईट असे दोन्ही पदर या चित्रपटातून उलगडणार आहेत. अमितसह या चित्रपटात गिरीजा जोशी, जयराज नायर, अनिकेत केळकर, संजय खापरे, संदेश जाधव हे कलाकार झळकणार आहेत.
‘फेसबुक गेम’ या चित्रपटाची निर्मिती मानसी मापुस्कर, रुद्राश पवार यांनी केली असून चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि निर्माता अशी तिहेरी धुरा समीर पवार यांनी सांभाळली आहे. येत्या २३ ऑगस्ट २०२३ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज होणार आहे. ही मर्डर मिस्ट्री पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.