“स्वामींवर श्रद्धा आणि माझ्यावर प्रेम असंच कायम असुद्या” – अक्षय मुडावदकर !

जय जय स्वामी समर्थ सोम ते शनि रात्री ८.०० वा. कलर्स मराठीवर !

 

मुंबई 9 मे २०२३ – कलर्स मराठी वरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या बाहेरून देखील रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभत आहे. मालिकेचे ७५० हून अधिक भाग आता पूर्ण झाले आहेत त्यानिमित्ताने अक्षय मुडावदकर (स्वामी समर्थ) यांनी आपला प्रवास सांगितला.

 

मालिकेच्या प्रवासाबद्दल आणि अनुभवा बद्दल काय सांगाल ?

७५० हून अधिक भाग,२.५ वर्षांचा प्रवास, अगणित अनुभव, मोठ्यांचे आशीर्वाद,लहानंच प्रेम…आणि स्वामी आजोबा म्हणून येणारी हाक……कधी स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला की आपल्या वाट्याला हे सगळं येईल…खरं तर ह्या पैकी फक्त १-२ गोष्टी जरी एक कलाकार म्हणून मिळाल्या असत्या तरी मी खुश असतो..मात्र आज स्वामी कृपेने इतकं मिळालंय की हे लिहतांना सुद्धा आनंदाश्रू अनावर होतात.असा एक दिवस जात नाही ज्या दिवशी मी घराबाहेर पडलो आणि कोणी येऊन भेटलं नाही.. कधी लहान मुलं, कधी आजी आजोबा,तर कधी कॉलेज ला जाणारी मुलं.. हॉस्पिटल असो..रेल्वे स्टेशन असो..किंवा एअरपोर्ट… प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे प्रेक्षक भेटतील मनापासून प्रेम दाखवतात…खरं तर हे सगळं माझ्या साठी नसून स्वामींकरता आहे हे ही मे जाणतो.

काय काय शिकायला मिळालं ?

खूप काही शिकलो मी ह्या प्रवासात.आणि एक माणूस म्हणून स्वतःला बदलण्याची एक संधी शोधू लागलो. माणूस म्हणून आपण कुठे चुकतोय हे परीक्षण करू लागलो..आणि त्या गोष्टींवर मात करून सुधारण्याचा प्रयन्त करू लागलो.स्वामीं बद्दल लहानपणापासून ऐकतोय मात्र आता स्वामींना खूप जवळून पाहू लागलो, अनभवू लागलो.आपसूक ओढ लागते त्यांच्या भेटीची…खरतर अक्कलकोट ला गेल्यावर मला शांत बसून राहायला खूप आवडतं..असं वाटतं 2-3 तास मला एकटं सोडा, कुणी बोलू नका माझ्याशी.तिथला परिसर,जिथे स्वामी फिरले असतील , जिथे जिथे त्यांचा वावर होता ते सगळं शांतपणे बसून अनुभवावस वाटतं आणी तिथे बसून स्वामींना खूप प्रश्न विचारावेसे वाटतात. अक्कलकोट मधील माझ सगळ्यात आवडतं ठिकाण म्हणजे गुरुमंदिर येथे असलेलं राममंदिर..तिथल्या पायऱ्यांवर तासन्तास शांत बसून समोर चारा खात निवांत बसलेल्या गायींकडे पहात राहावंसं वाटतं. स्वामी म्हणतात की “हम गया नही जिंदा है” आणि खरंच हा अनुभव अक्कलकोट ला गेल्यावर मिळतो…स्वामी अजूनही तिथेच आहेत हे जाणवतं.

पहिली मालिका आणि स्वामी साकारायला मिळणं काय सांगाल ?

काय आणि किती बोलू…सगळं सगळं दिलंय स्वामींनी…एक कलाकार म्हणून जे जे हवं असतं ते सगळं दिलंय…ओळख, प्रसिद्धी,मान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम करण्याच समाधान. आज माझ्या करिअरची सुरुवात साक्षात स्वामींच्या भूमिकेने व्हावी हा खरंतर मी माझ्या पुढील प्रवासा करिता मिळालेला स्वामींचा आशीर्वाद समजतो आणि त्यांच नाव घेऊन पुढील प्रवासाची सुरुवात करतो…एव्हढच म्हणींन की मी फक्त एक कलाकार आहे जो स्वामींच्या भूमिकेतून त्यांच्या लीला तुम्हा सगळ्यां पर्यंत पोहचवण्याचा फक्त प्रयत्न करतोय…तेव्हा “स्वामींवर श्रद्धा आणि माझ्यावर प्रेम असंच कायम असुद्या”

जय जय स्वामी समर्थ सोम ते शनि रात्री ८.०० वा. कलर्स मराठीवर !

Leave a Reply