सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ दिमाखदार पुरस्कार सोहळा संपन्न

‘महाराष्ट्र’ या नावातच सर्व काही सामावलेलं आहे. समाजकारण, अर्थकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, संगीत, कला, राजकारण या सगळ्या क्षेत्रात महाराष्ट्रानं यशाची परंपरा जपत अटकेपार झेंडे रोवले आहेत. अशा महाराष्ट्राच्या असामान्य धुरिणींचा आणि संस्थांचा सन्मान करणारा ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ हा दिमाखदार सोहळा नुकताच एमएमआरडीए मैदानामध्ये संपन्न झाला.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘अर्थ’ संस्थेतर्फे आयोजित केलेल्या ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ या रंगारंग सोहळ्यात महाराष्ट्रातील कर्तृत्ववान, प्रतिभावान आणि राज्याला गौरव प्राप्त करून देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, चित्रपट आणि आरोग्य अशा क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम काम करणाऱ्यांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला. सामाजिक, राजकीय आणि कला क्षेत्रातील असंख्य मान्यवर मंडळी याप्रसंगी उपस्थित होती.

‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ हा पुरस्कार घेताना आनंद तर आहेच पण अशा पुरस्कारांनी जी शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडते ती खूप प्रेरणादायी ठरते, असे सर्वच पुरस्कार विजेत्यांनी यावेळी बोलून दाखविले.

दीपप्रज्वलना नंतर ‘लाभले आम्हांस भाग्य’ या अभिमानगीताने आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृती जागवत, त्यांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन करून या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. गणेशवंदना, शेतकरी, वारी, धनगरी, कोळी वासुदेव, लावणी, गोंधळ, शिवराज्याभिषेक अशा महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृती, परंपरेची झलक या सोहळ्यात घडविण्यात आली.

मयुरेश पेम, नेहा महाजन, मीरा जोशी, अंशुमन विचारे, मेघा घाडगे, सोनाली पाटील, प्रणव रावराणे, माधव देवचक्के, मयुरेश वाडकर, अस्मिता सुर्वे आदि कलाकारांच्या बहारदार सादरीकरणाने सोहळ्यात रंगत आणली. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि अभिनेत्री समीरा गुजर-जोशी यांनी केले.

महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत योगदान दिलेल्या मान्यवरांची ओळख समाजाला व्हावी, या हेतूने आम्ही ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ हा पुरस्कार सोहळा आयोजित केला असल्याचे सांगत समाजासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्यांचा सन्मान करण्याची संधी ‘अर्थ’ फाऊंडेशनला मिळाली हा आमचा देखील गौरव आहे, अशा भावना व्यक्त करत अर्थ संस्थेचे सर्वेसर्वा प्रवीण कलमे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Leave a Reply