मराठी सिनेमा संपवला जातोय, आता यापुढे सिनेमा करण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाही’ – दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे
आज ‘महाराष्ट्र दिना’च्या निमित्ताने सगळेच जण मराठी भाषेचा, महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान बाळगून आजचा दिवस साजरा करण्यात मग्न आहेत. मात्र आजच्या या दिनी मराठी माणसाची होणारी गळचेपी ही उघडकीस आल्याने कुठेतरी या महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्याला आपणच गालबोट लावलंय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मराठी चित्रपटांना स्क्रीन न मिळणे हा मुद्दा काही जुना नाही. बरेचदा या विषयावर कलाकार मंडळींनी आवाज उठवलाय पण अद्याप यावर तोडगा काही निघाला नाही. आज लोकांना चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघायचा आहे, त्या चित्रपटाला पाहून न्याय द्यायचा आहे असं लोकांच स्पष्ट म्हणणं असताना चित्रपटगृहात शो नसल्या कारणास्तव होणारी तारांबळ ‘टीडीएम’ हा चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या लोकांच्याच तोंडून समोर आली आहे. २८ एप्रिलला टीडीएम हा चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.
याबाबत आज कलावंताआधीच नागरिकांनी पुढाकार घेऊन शो का नाहीत अशी विचारणा केली. या संपूर्ण चित्रावर भाष्य करत ‘ख्वाडा’, ‘बबन’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर ‘टीडीएम’ हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस घेऊन येणारे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांना अश्रू अनावर झालेत. यावेळी बोलताना भाऊराव थोडं स्पष्टच म्हणाले की, ‘आज ‘टीडीएम’ चित्रपट लोकांना आवडतोय आणि लोक हा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त ही करतायत मात्र चित्रपटगृहात शो नसल्याकारणास्तव मराठी प्रेक्षकांवर आणि आम्हा सर्व कलाकारांवर हा अन्याय होतोय. मला कुठेतरी वाटतंय की हे सर्व चित्र पाहून मराठी सिनेमा संपतोय, किंवा संपवला जातोय. आता यापुढे सिनेमा करण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाही. आम्ही असं म्हणत नाही आमचा सिनेमा चांगला आहे, पण सिनेमाला प्रेक्षक प्रतिसाद देत असताना शो रद्द करणं हे कितपत योग्य आहे.
परवा पासून पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात एक शो होता, काल दोन शो होते चित्रपट गृह तुडुंब भरलेले असताना ही वाढवून शो दिलाच नाही. लोकांना चित्रपट पाहायचाय त्यांची मागणी आहे, म्हणून मी स्वतः थेटर मालकांजवळ विचारपूस केली तर त्याच असं म्हणणं आहे की एकच शो लावा असा वरून प्रेशर आहे. माझ्या चित्रपटाला जे शो मिळाले आहेत ते पण प्राईम टाईम मधील नसून ऑड टाईममधील आहेत, आणि ऑड टाईम असल्यामुळे प्रेक्षकांना त्या वेळेत तिथवर पोहोचणं शक्य नाही आहे आणि हे सर्व पाहून आम्हाला खूप त्रास होतोय. माझा चित्रपट नसेल आवडला तर स्पष्ट मला लोकांनी सांगावं की, तुझा सिनेमा चांगला नाही, तू लायक नाहीस त्या दिवशी मी सिनेमा निर्मितीच काम बंद करेन’. असं म्हणून भाऊराव कऱ्हाडे यांना अश्रू अनावर झाले.
दरम्यान नवोदित कलाकारांना घेऊन चित्रपट करणं हे धाडस भाऊराव नेहमीच करतात. या चित्रपटाचा नायक पृथ्वीराज थोरात याने देखील आपलं मत मांडत भाष्य केलं, नवोदित कलाकाराचा पहिला सिनेमा चालावा, त्या चित्रपटाचं नाव व्हावं असं प्रत्येकाला वाटत, मात्र शोच नसल्याने हा सिनेमा पाहू शकलो नाही हे ऐकताना त्यांनी आपल्या मनावर कसा दगड ठेवला असेल त्यांनाच ठाऊक. पृथ्वीराज ही रडत रडत म्हणाला, ‘लोकांना, मायबाप प्रेक्षकांना हा शो हवाय, ते आम्हाला विचारत आहेत कधी लागणार शो असं असताना चित्रपटगृहात शो नाही ही लाजवणारी गोष्ट आहे. कुठेतरी हे थांबलं पाहिजे, मराठी सिनेमा पुढे यायला हवा. आम्ही या क्षेत्रात नवीन आहोत, आमची खरच इच्छा नाही राहिली, एवढे मोठे, जाणकार लोक असताना आम्ही नव्याने येणाऱ्यांनी काय आदर्श घ्यावा, आम्ही खरंच काम करावी की नाही. महाराष्ट्राला काही द्यावं की नाही हा प्रश्नच पडलाय. महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारा हा चित्रपट तुम्ही पहा आणि आमचं चुकलं असेल तर आम्हाला नक्की कळवा. रसिकांना पृथ्वीराजने हात जोडून विनंती केलीय की, या माझ्या सिनेमाला तुम्ही पोचवा आणि तुम्हीच न्याय मिळवून द्या.
दरम्यान मध्यमवर्गीय कुटुंबातून सिनेमाविश्वात नाव करू पाहणाऱ्या या ‘टीडीएम’ चित्रपटातील नायिकेचंही अंतःकरण जड झालं, हुंदके देत कालींदी म्हणाले, ‘मला सर्वांना एकच विनंती करायची आहे, तुम्ही हा चित्रपट पहा आणि मग ठरवा तुम्हाला हा चित्रपट आवडला आहे की नाही. दिवसाला एक शो आहे ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही दोघेही नवीन आहोत, याआधी काहीच नव्हतो आणि आज चित्रपटाचे नायक नायिका आहोत. भाऊराव सरांनी आम्हाला स्वप्न दाखवलं, आता या इतक्या मोठ्या क्षेत्रात पाऊल टाकतोय आणि ही अशी निराशा पदरी पडणं कितपत योग्य आहे.
२८ एप्रिल २०२३ रोजी हा सिनेमा संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. आज चित्रपटाचे प्रमोशन करताना चित्रपटगृहात प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असताना, चित्रपटगृहात आपल्या चित्रपटाला शोच नाहीत ही बाब लक्षात येता या विषयावर दोन शब्द मत मांडणाऱ्या ‘टीडीएम’ चित्रपटातील कलाकारांचा उर भरून आला. आज मराठी चित्रपटांना योग्य तो न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनीच कलाकारांच्या, निर्मात्यांच्या, दिग्दर्शकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं ही आपली जबाबदारी समजूया.