“अशी होती की अल्ला सुद्धा तिचं सगळं ऐकायचे”मिलिंद गवळी यांनी शेअर केली भावुक पोस्ट

आई कुठे काय करते ही स्टार प्रवाह वरील एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील कलाकारांनी आपल्या अभिनयातून आपली वेगळी अशी एक ओळख प्रेक्षकांमध्ये निर्माण केली आहे.या मालिकेमध्ये अभिनेते मिलिंद गवळी हे अनिरुद्ध ही भूमिका साकारतात. मिलिंद गवळी हे नेहमीच आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सेट वरील अनेक फोटो आणि व्हिडिओ टाकत असतात. तसेच ते आपल्या खाजगी आयुष्यातील काही क्षण व्हिडिओ आणि पोस्टच्या माध्यमातून सोशल मीडियावर देखील पोस्ट करत असतात.
नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला.
मिलिंद यांनी त्यांच्या आईसोबतचे काही फोटो शेअर केले.

या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”आज चौदा वर्ष पूर्ण झाली माझ्या आईला जाऊन,
२ मार्च २००९ संध्याकाळी ६ वाजता माझ्या आईची गुरु, गुरुमाई चित्विलासानंद यांचा जप करत करत ती निघून गेली, अफाट श्रद्धा आणि प्रेम,श्रद्धा आणि सबुरी हे तिचं ब्रीदवाक्य होतं,
असीम प्रेम , सतत इतरांची सेवा, आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करत राहणे, कोणालाही कधीही दुखवू नये , लोकांची मनं सांभाळावी, भुकेलेला दोन घास खाऊ घालावे , मग तो मग तो कोणीही असो , मालक असो ड्रायव्हर असो राजा रंक असो, नातेवाईक असो ओळखीचा असो किंवा अनोळखी असो, अतिथी देवो भव, स्वतःआधी दुसऱ्याचा विचार करावा,

प्रेमाशिवाय जगामध्ये दुसरं काहीही महत्त्वाचं नाही, असंख्य उपवास, पूजा पाठ, देवदर्शन, शिर्डीच्या साईबाबांनी नवसाने मुलगा दिला, मुंबईच्या महालक्ष्मी ने मुंबईत राहायला घर दिलं, शेगावच्या गजानन महाराजांनी मुलाचे शिक्षण पूर्ण केलं, वैष्णव देवीने नवऱ्याला नोकरीत यश दिलं, तिच्या प्रेमाच्या माणसांना जे काय हवं असेल ते ती परमेश्वराकडन मागून घ्यायची, आणि त्याला द्यावं लागायचं , त्याला नवस बोलायची आणि तो नवस ती आवर्जून फेडायची, संतोषी मातेचे व्रत असो ,नवरात्रीचे नऊ दिवस उपवास असो, गुरूवरचा साईबाबा चे उपास तर आहे, सोमवारी शंकराचा उपवास, शनिवारी शनीचा उपवास,

बुधवारी माहीम चर्च ला जायचं, मदर मेरी शी सुद्धा तिची मैत्री होती, शुक्रवारी माहीमच्या मगदूम बाबाच्या दर्ग्यात जायचं, ती अशी होती की अल्ला सुद्धा तिचं सगळं ऐकायचे,
माझी बहीण संगीता तिची दहावीची परीक्षा , दुसऱ्या दिवशी कुठलं तरी विषयाचा paper होता आणि घरी पाहुणे आले, आई माझ्या बहिणीला म्हणाली “अग काळजी करू नको मार्क काय तुला माझे परमेश्वर भरपूर देईल , अभ्यास सोड आणि मला स्वयंपाकात मदत करायला ये”, आणि निकाल लागला तर ती चांगल्या मार्गाने पासही झाली होती,

खरच माझं पोस्ट ग्रॅज्युएशन तर तिच्या परमेश्वरा मुळेच पूर्ण झालंय, नाहीतर शिक्षणाचा आणि माझा 36 चा आकडा होता. तिच्या आशीर्वादाशिवाय आयुष्यात काहीही घडत नव्हतं आणि अजून ही नाही.
ती जाऊन इतकी वर्ष झाली तरी सुद्धा ती आहे , आपल्या जवळच आहे आपल्याला ती कधी सोडून गेलेलीच नाही अशी सतत जाणीव असते,
मला तर खात्रीच वाटते , की आई आता कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवी बरोबर गप्पा मारत बसली असेल,

तुळजापूरच्या भवानी मातेची सेवा करत बसली असेल, किंवा शिर्डीच्या साईबाबा च्या मंदिरात, किंवा मग सिद्धिविनायकाला मोगऱ्याचे गजरे करून देत असे. आणि ते करत असताना त्यांना आपल्या लेकरांना आपल्या माणसांना सुखी ठेव हेही सांगत असेल.
“मातृ देवो भव”
अभिनेता मिलिंद गवळी यांची ही पोस्ट खूपच व्हायरल होत आहे त्यांच्या चाहत्यांनी लाईक आणि कमेंट चा वर्षाव त्यांच्या या पोस्टवर केला आहे.

Leave a Reply