‘वाळवी’च्या सक्सेस पार्टीत ‘वाळवी २’ची घोषणा
परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ हा मराठीतील पहिली थ्रिलकॅाम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चौथ्या आठवड्यातही प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये आणण्यात यश आले आहे. हेच यश साजरे करण्यासाठी आणि परेश मोकाशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते आणि हेच औचित्य यावेळी ‘वाळवी २’ची घोषणाही करण्यात आली. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी आणि झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी यांनी लवकरच ‘वाळवी २’ घेऊन येत असल्याचे जाहीर केले.
दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखक, निर्माती मधुगंधा कुलकर्णी म्हणतात, ‘’ हा चित्रपट प्रेक्षकांना आवडतोय. त्यांच्याकडून चित्रपटाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळेच आम्हाला ‘वाळवी २’ची प्रेरणा मिळाली. ‘वाळवी’मध्ये ज्याप्रमाणे अनेक गोष्टी अनपेक्षित होत्या, त्यापेक्षाही जास्त सस्पेन्स आणि थ्रील ‘वाळवी २’मध्ये असणार आहेत. सध्या तरी हे सगळं गुपित आहे.’’
झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी म्हणतात, या यशात दिग्दर्शक, कलाकार, पडद्यामागील संपूर्ण टीम यांच्यासोबतच मीडियाचाही तितकाच सहभाग आहे. मीडियाने वेळोवेळी प्रेक्षकांपर्यंत ‘वाळवी’ला पोहोचवले. लवकरच आता ‘वाळवी २’ हा थ्रीलकॅाम घेऊन तुमच्या भेटीला येऊ.’’
या सिनेमात कोण कलाकार असणार इथूनच हा सस्पेन्स सुरू होत असून दिसतं तसं नसतं अशी टॅगलाईन असणाऱ्या ‘वाळवी २’मध्येही असेच गुपित दडलेले असून, जे लवकरच उलगडेल.’