‘जारण’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार अमृता सुभाष
हृषीकेश गुप्ते दिग्दर्शित ‘जारण’ या भयपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले. पोस्टर बघून प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न पडले असतानाच आता या चित्रपटातील एक चेहरा समोर आला आहे. या चित्रपटात चौकटीबाहेर जाऊन आव्हानात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता सुभाष महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ‘जारण’ हा मानवी भावना आणि दुहेरी आयुष्याचा शोध घेणारा प्रवास असून यात अनेक रहस्ये लपली आहेत, जी प्रेक्षकांना थरारक अनुभव देतील.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अमृता सुभाषच्या चेहऱ्यावर टाचण्या टोचलेल्या दिसत असून डोळे बरंच काही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आता हे रहस्य चित्रपट आल्यावरच उलगडणार आहे.
या भूमिकेबद्दल अमृता सुभाष म्हणते, ” मला नेहमी असे वाटते की कलाकाराने एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेपुरताच मर्यादित राहू नये. मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडते. माझ्या इतर भूमिकांच्या तुलनेत अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती. ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती. परंतु दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझे हे काम सोपे झाले. ज्यावेळी मी ‘जारण’चे स्क्रिप्ट वाचले तेव्हाच हा चित्रपट करण्याचे ठरवले. माझ्या भूमिकेबद्दल मी आता जास्त काही सांगणार नाही, मात्र हे आवर्जून सांगेन, ही एक अशी रहस्यमय कथा आहे, जी प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवेल.”
ए अँड सिनेमाज एलएलपी प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिसेस निर्मित ‘जारण’ चित्रपट येत्या ६ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी ‘जारण’चे निर्माते आहेत.