ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा
योगी पावन मनाचा। साही अपराध जनाचा।
विश्व रागे झाले वन्हि। संते सुखे व्हावे पाणी।
शब्द शस्त्रे झाले क्लेश। संती मानावा उपदेश।
विश्वपट ब्रह्म दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।
“प्रत्येकाच्या जीवनात अध्यात्मिक तेजाचे दीपप्रज्वलित करत संपूर्ण विश्वासाठी ‘पसायदान’रूपी विश्वप्रार्थना लिहिणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज अवघ्या विश्वाचे माऊली बनले. भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या कुटुंबाची चरित्रगाथा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या माध्यमांतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचणार आहे. माउलींचे समता, बंधुतेचे विचार आणि आचरण यांचे आदर्श उलगडून दाखवतानाच प्रेक्षकांना दिव्यत्वाचे दर्शनही अनुभवायास मिळणार आहे. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित हा भव्य चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.
नुकताच या चित्रपटाचा हृदय संगीत सोहळा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते संपन्न झाला. ‘न भूतो न भविष्यती’ असा जिवंत संगीत सोहळा मी पहिल्यांदाच अनुभवाला प्रत्येकाच्या मनात संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असतेच त्या प्रतिमेला परत उजाळा देत जिवंत करण्याचे काम या सुरेल सोहळ्याने केले असे सांगत ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.
रंगलेल्या या स्वरयज्ञात गायकांनी सुरेल आवाजात गीते सादर करून ज्ञानेश्वर चरित्राची अनुभूती दिली. शेकडो श्रोत्यांच्या उपस्थितीत भक्तिपूर्ण वातावरणात ज्ञानेश्वरीचा हा आनंद सोहळा रंगला. ज्ञानेश्वरीच्या सर्व गीतांच्या सादरीकरणांमध्ये श्रोते रममाण होऊन गेले होते. तर काही गीतांच्या सादरीकरणाच्या वेळी श्रोत्यांचे डोळे पाणावले. पसायदानाच्या अलौकिक अनुभूतीला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. या सुमधुर गीतांच्या सादरीकरणासोबतच संत ज्ञानेश्वरांच्या गाथेतील काही प्रसंग ही यावेळी सादर करण्यात आला. एकाहून एक सरस एक अभंगांनी वातावरण भक्तिमय होत गेले. कार्यक्रम असा उत्तरोत्तर रंगत असताना मनावर विशेषत्वाने ठसा उमटला तो पसायदानाच्या अलौकिक अनुभूतीने. या सगळ्या अभंगांचं निरूपण करत असताना ज्ञानेश्वरांचं चरित्र,त्यांची शैली, तिचे अनेकविध पैलु याबद्दल अतिशय मनमोकळा संवाद साधत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या सोहळ्यात वेगळंच चैतन्य आणलं.
या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, यांनी तर संगीत वितरणाची जबाबदारी झी म्युझिकने सांभाळली आहे.
परस्परांशी आर्त जिव्हाळ्याने बांधलेल्या आणि जगण्याचे एकच प्रयोजन असलेल्या भावंडांचे नाते कसे असावे हे दाखवतानाच व्यवहाराची थोर शिकवण शब्दाशब्दांतून देत असतानाच भक्तीचे रहस्य या भावंडांनी सहज उलगडून दाखविले. वैयक्तिक आत्मोद्धाराला लोकोद्धाराची जोड देऊन आत्मकल्याण आणि विश्वकल्याण साधावे हे सर्व तत्वज्ञान या भावंडांच्या पदोपदी प्रत्ययास येते. विश्वाला मांगल्य प्रदान करणाऱ्या या भावंडांचे अजोड कार्य व विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे व्हावेत, या उद्देशाने ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा विषय हाती घेतल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतात.