“१२ वर्ष एकटी मुलीचा सांभाळ केल्यानंतर तिनेही स्वतःच्या पायावर उभं राहावं हा अट्टाहास” ( Surekha Kudachi julali gath g )
‘सन मराठी’वरील आगामी मालिका ‘जुळली गाठ गं’ या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री सुरेखा कुडची यांची महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळत आहे. १३ जानेवारी २०२५ पासून सोम ते रवि रोज रात्री ८.३० वा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बहुतांश ठिकाणी लग्नानंतर मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहता येत नाही आणि असंच काहीस मालिकेतील मुख्य अभिनेत्री सावीबाबत घडत असल्याचं दिसून येत आहे. एकंदरीतच मालिकेचा विषय आजच्या प्रत्येक स्त्रीच्या मनाला भिडणार आहे. मालिकेत धैर्यच्या आईची भूमिका अभिनेत्री सुरेखा कुडची साकारत आहेत. सुरेखा यांनी या आधी बऱ्याच मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
हेही वाचा :- अभिनेत्री पुर्वा कौशिक हिच्या खऱ्या आयुष्याबदल बरच काही ( Purva Kaushik Biography 2025 )
या भूमिकेबद्दल संवाद साधताना सुरेखा कुडची म्हणाल्या की, “गेली १५ वर्ष मी मुंबई मध्ये काम केलं आहे. जेव्हा मला समजलं की, मालिकेचं शूटिंग कोल्हापूरला होणार आहे त्या क्षणी मला खूप आनंद झाला. दिवाळीमध्ये मी कोल्हापूरला जाऊन मालिकेसाठी अंबाबाईकडे साखड घातलं. मालिकेतील भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर, या आधीही मी जाच करणारी सासू अशी भूमिका साकारली आहे; पण ही भूमिका थोडी वेगळी आहे असं मी म्हणेन कारण, तिच्या नवऱ्याचं निधन झाल्या नंतर ती एकटी घर सांभाळते. त्यामुळे तीच एक वेगळंच विश्व आहे. त्यात नव्या लूकमध्ये मी प्रेक्षकांसमोर येत आहे या गोष्टीचा आनंद आहेच. मालिकेच्या माध्यमातून जो विषय दाखवण्यात येणार आहे तसे किस्से मी माझ्या जवळच्या नातेवाईकांमध्ये घडताना पाहिलं आहे. मुलगी शिक्षणात किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर असली तरीही काही भागात तिची स्वप्न सोडून लग्न कर असा सल्ला दिला जातो.”
यापुढे सुरेखा म्हणाल्या की, “मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे ही काळाची गरज आहे. माझ्या नवऱ्याच्या निधनानंतर म्हणजेच गेली १२ वर्ष मी माझ्या मुलीचा सांभाळ करताना तिला एकच गोष्ट सांगते, स्वतःच्या पायावर उभी रहा. कधीच कोणावर अवलंबून राहू नकोस. या सगळ्या कारणांमुळे ‘जुळली गाठ गं’ या मालिकेतील भूमिका मला खूप जवळची वाटते. २०२४ या वर्षाचा शेवट व २०२५ या वर्षाची सुरुवात माझ्यासाठी खूप खास ठरली आहे.”