अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट ( Actress Prajakta Mali met Devendra Fadnavis )
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांच्या बद्द्दल केलेल्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त करत ‘धस यांनी माफी मागावी’, अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळीने केली होती. पण, सुरेश धस यांनी माफी मागण्यास नकार दिल्यानंतर प्राजक्ता माळीने रविवारी (२९ डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
बीडमध्ये मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरणाचे पडसाद सर्वत्र उमटत आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीसह काही अभिनेत्रींची नावे घेत एक विधान केले. ‘वीटभट्ट्या, जमीन बळकावून प्रचंड पैसा मिळवत इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना इथे (परळी) आणले जाते’, असे धस म्हणाले होते.
हेही वाचा :- लग्नाला वेगळा दृष्टीकोन देणारा चित्रपट | Hashtag Tadev Lagnam Movie Review | Hashtag Tadev Lagnam
आमदार सुरेश धस यांच्या या विधानानंतर प्राजक्ता माळी हिने पत्रकार परिषद घेतली. आणि आपली भूमिका मांडली. यावेळी तिने सुरेश धस यांनी केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी अशी मागणी केली. यावर मी प्राजक्ता माळी यांची माफी मागणार नाही अशी भूमिका आमदार सुरेश धस यांनी घेतली.
सुरेश धस यांच्या या वक्तव्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागीतली होती. त्यानंतर रविवारी (२९ डिसेंबर) ला प्राजक्ता माळी हिने सागर बंगल्यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या वेळी प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिले त्यात तिने आमदार सुरेश धस यांना समज द्यावी. त्याचबरोबर सोशल मीडियावर विनाकारण ट्रोल केलं जात आहे, त्याची दखल घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्वस्त केले. त्यांच्याविरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली. त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले.