प्रसादची केस स्वप्नील कडे ,जिलबी चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित ( Jilabi Marathi Movie 2025 Teaser )
अभिनेता प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी हे दोन्ही कलाकार नेहमीच चर्चेत असतात. सध्या मात्र हे दोन्ही कलाकार एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. प्रसाद ओकच्या केसची धुरा स्वप्नील जोशी सांभाळणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेलच नेमकं प्रकरण काय ? आणि कोणती केस? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला १७ जानेवारीला येणारा ‘जिलबी’ चित्रपट पहावा लागेल.
‘मला ना गोल गोल फिरवता येत नाही’ मी डायरेक्ट पॉईंट वर येतो. ‘एकदा सुरू झालं ना..की मुळासकट सगळं बाहेर निघेल..! अशा दमदार संवादांसह जिलेबीचा टिझर प्रदर्शित झाला आहे. घटना-प्रसंगांतून निर्माण झालेले गूढ उकलताना उद्योगपती सौरव सुभेदार डॅशिंग पोलीस अधिकारी विजय करमरकर याची मदत घेतात. यातील पोलीस अधिकारी विजय करमरकर याची भूमिका स्वप्नील साकारणार आहे. स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक या दोन आघाडीच्या कलाकारांनी एकत्र सिनेमात दिसावं असं त्यांच्या चाहत्यांना नेहमी वाटत असतं, ‘जिलबी’च्या निमित्ताने या दोन अष्टपैलू कलाकारांना एकत्र बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ १७ जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्रसाद सांगतो, ‘वेगवेगळया भूमिका आणि उत्तम कलाकारांसोबत काम करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं.’ ‘जिलबी’ च्या निमित्ताने एक वेगळी भूमिका करण्याची संधी मिळाली. अत्यंत रुबाबदार, सगळ्या क्षेत्रात दबदबा आणि मानसन्मान असेलला उद्योगपती सौरव सुभेदार करताना मला ही तितकीच मजा आली. गोड आणि गूढ असे दोन्ही स्वाद देणारी ‘जिलबी’ प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील.
‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे चित्रपटाचे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेन्ट प्रा.लिमिटेड यांच्या सहयोगाने आणलेला ‘जिलबी’ चित्रपट १७ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.