दाक्षिणात्य अभिनेत्री शान्वी श्रीवास्तव मराठीत
समित कक्कड दिग्दर्शितआगामी मराठी चित्रपटाची मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेत्री आणि मॉडेल शान्वी श्रीवास्तव मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करते आहे.
या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अॅक्शनपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शान्वी श्रीवास्तव हिने दाक्षिणात्य चित्रपटांच्या दुनियेत चांगलंच नाव कमवलं आहे. शान्वीने २०१२ मध्ये तेलुगू चित्रपट लव्हली द्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते.‘अड्डा’,‘प्यार में पडीपोयने’,‘भले जोडी’,‘मुफ्ती’,‘चंद्रलेखा’ यासारख्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.
‘रानटी’ चित्रपटात मैथिली या महत्त्वाच्या भूमिकेत शान्वी दिसणार आहे. ‘रानटी’ या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला.
सोबतच दिग्दर्शक समित कक्कड सारख्या नावाजलेल्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभवही कमालीचा असल्याचा ती सांगते. या चित्रपटातून तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहस दृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम चित्रपटाला लाभलेली आहे.