चित्रपटसृष्टीलाही ‘पाणी’ची भुरळ

 

राजश्री एंटरटेन्मेंट, प्रियांका चोप्रा जोनस आणि कोठारे व्हिजन प्रस्तुत ‘पाणी’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी तसेच मान्यवरांनी याची भरभरून प्रशंसा केली आहे. मराठवाड्यातील गंभीर पाणीटंचाई आणि त्या परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या एका साध्या तरुणाची असाधारण झुंज यातून उलगडली आहे.

 

महेश मांजरेकर, पंकजा मुंडे, नीना कुलकर्णी, संजय मोने, सुकन्या मोने, मकरंद अनासपुरे, सोनाली खरे, अमृता खानविलकर अशा अनेक कलाकारांनी या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे.

चित्रपटाविषयी प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी स्वतः मराठवाड्यातील असल्याने हा चित्रपट माझ्यासाठी विशेष जवळचा आहे. ग्रामीण भागातील लोकांची पाण्यासाठी होणारी संघर्षयात्रा यात दाखवण्यात आली आहे. मनाला भिडणारी ही कथा प्रत्येकाने पाहायला हवी.”

 

महेश मांजरेकर म्हणतात, “हा एक अपवादात्मक चित्रपट आहे आणि प्रेक्षक याचा आनंद लुटतील. चित्रपटात एक सुंदर प्रेमकथा साकारली आहे. बराच काळानंतर इतका सुंदर चित्रपट पाहायला मिळाला. प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट अवश्य पाहावा.” तर मकरंद अनासपुरे म्हणतात, “जणू काही एक सुंदर काव्य अनुभवत असल्याचा फील ‘पाणी’ पाहताना आला.

 

अप्रतिम संवाद, उत्तम अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शन या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. संवेदनशील प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल.” अशा अनेक सकारात्मक आणि प्रशंसात्मक प्रतिक्रिया या चित्रपटाबद्दल मिळत आहेत. सिनेसृष्टीबरोबरच प्रेक्षकांनाही हा चित्रपट मनापासून भावतो आहे.

 

चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन आदिनाथ कोठारे यांनी केले आहे. नेहा बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॉ. मधू चोप्रा आणि दिवंगत रजत बडजात्या हे चित्रपटाचे निर्माते आहेत, तर महेश कोठारे आणि सिद्धार्थ चोप्रा हे सह-निर्माते आहेत.

 

या चित्रपटात आदिनाथ कोठारे, सुबोध भावे, रुचा वैद्य, रजित कपूर, किशोर कदम, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, आणि विकास पांडुरंग पाटील या कलाकारांची दमदार फौज आहे.

Leave a Reply