स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका आई-बाबा रिटायर होत आहेत…
200 आठवडे सातत्याने आघाडीवर रहात स्टार प्रवाह वाहिनीने संपूर्ण महाराष्ट्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. स्टार प्रवाहच्या सर्वच मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. प्रेक्षकांच्या अभिरुचीचा अभ्यास करुन त्यांना आपलेसे वाटतील असे मालिकेचे विषय, घरातील सदस्य वाटावीत अशी पात्र आणि सोबतीला जाणकार अशी लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांची फौज हेच स्टार प्रवाहचं खऱ्या अर्थाने वेगळेपण. मायबाप प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच आज संपूर्ण महाराष्ट्राची पहिली पसंती स्टार प्रवाह वाहिनीला आहे.
हेच प्रेम द्विगुणीत करण्याच्या हेतूने स्टार प्रवाह सादर करीत आहे नवी मालिका आई बाबा रिटायर होत आहेत. मालिकेचं शीर्षक ऐकताक्षणीच आपल्या डोळ्यासमोर आपले आई-बाबा नक्कीच उभे रहातात. प्रत्येकाच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची मात्र तितकीच गृहित धरली जाणारी ही दोन हक्काची माणसं. आयुष्यभर खस्ता खाऊन आईवडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात. मुलं शिकून स्वत:च्या पायावर उभी रहातात, त्यांच्या संसारात रमूनही जातात. आई-वडील मात्र घरच्या जबाबदारीतून कधीही रिटायर होत नाहीत.
मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांची नोकरी, त्यांचं लग्न आणि नंतर नातवंडं एकामागोमाग येणाऱ्या या जबाबदारीच्या चक्रात ते नकळतपणे अडकून जातात. आई-बाबा रिटायर होत आहेत ही मालिका देखिल अश्याच एका जोडप्याभोवती फिरते ज्यांना खरतर घरच्या जबाबदाऱ्यांमधून निवृत्त तर व्हायचं आहे मात्र न संपणारं जबाबदारीचं ओझं त्यांच्यावर नकळतपणे लादलं जातं. ख्यातनाम कलावंत निवेदिता सराफ आणि मंगेश कदम या नव्या मालिकेतून भेटीला येणार आहेत.
स्टार प्रवाहच्या या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, ‘आई आणि वडील हे आपले दैवत असतात आणि ही मालिका त्यांना आणि त्यांच्या निःस्वार्थपणाला अर्पण आहे. जे बोट धरून आपण चालतो, जी पावलं आपल्याला बळ देतात ती सुद्धा कधीतरी थकतील, त्यांना सुद्धा त्यांच्या जबाबदारीतून कधी तरी मुक्तता मिळायला हवी.
त्यांना सुद्धा जाणीव करून देणं फार महत्वाचं असतं की आता आराम करा. मुलं, सुना, जावई, नातवंड अशी अनेक नाती उलगडत जाणारी ही गोष्ट आणि आई-वडील त्यांची भूमिका कशी शेवटपर्यंत ठामपणे आणि प्रामाणिकपणे बजावतात हे अधोरेखित करणारी ही मालिका आहे. ही मालिका सर्वांच्या घरात आणि मनात स्थान मिळवेल यात शंका नाही.’*
तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका आई बाबा रिटायर होत आहेत लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.