‘पाहिले न मी तुला’ नाटकाचा मुहूर्त
नव्या नाटकांतून विषयांचं वैविध्य पाहायला मिळत आहे. नाट्यगृहांवर लागणाऱ्या नाटकांच्या पाट्यांकडे नजर टाकली, तर नाटकांची नवी नावेही लक्ष वेधून घेतात. लवकरच हटके शीर्षक असलेलं सुमुख चित्र आणि अनामिका प्रस्तुत ‘पाहिले न मी तुला’ हे नवंकोर नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे. लेखक-दिग्दर्शक सुनिल हरिश्चंद्र यांनी नात्याच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टीचा वेध यातून घेतला आहे.
‘सुमुख चित्र’ ही निर्मिती संस्था आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् च्या सहकार्याने अनेक नव्या नाट्यकृती रंगभूंमीवर आणणार असून सुमुख चित्र’ संस्थेच्या माध्यामातून आगामी काळात अनेक चांगले सामाजिक विषय नाटकांच्या माध्यमातून रसिकांसमोर सादर केले जाणार असून नवोदित कलाकार, लेखक-दिग्दर्शक यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज विविध क्षेत्रात यशस्वी पद्धतीने कार्यरत असून आता ही कंपनी ‘सुमुख चित्र’ च्या माध्यमातून नाट्यक्षेत्रात पदार्पण करत आहेत. सुमुख चित्र चे कार्यकारी निर्माते निखिल जाधव आहेत. सूत्रधार दिनू पेडणेकर आहेत.
सध्या जमाना ‘फिल्टर’चा आहे. एखादी गोष्ट अधिक छान असावी यासाठी ‘फिल्टर’ चा वापर केला जातो. नवे नाते निर्माण करताना किंवा असलेले नाते जपताना महत्त्वाचा असेलला ‘फिल्टर’ अर्थात, दृष्टिकोन व विश्वास आपण जाणीवपूर्वक निर्माण करतो का ? योग्यवेळी तो वापरतो का?
हे बघणं ही तितकंच आवश्यक असतं हे दाखवणाऱ्या ‘पाहिले न मी तुला’ या नाटकाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. या मुहूर्त प्रसंगी निर्माते प्रसाद कांबळी, अजय विचारे ही मान्यवर मंडळी उपस्थित होती. अंशुमन विचारे, हेमंत पाटील , सुवेधा देसाई या कलाकारांच्या या नाटकात भूमिका आहेत.
नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून संगीत निनाद म्हैसळकर यांचे आहे. प्रकाशयोजननेची जबाबदारी राजेश शिंदे यांनी सांभाळली आहे. वेशभूषा वरदा सहस्त्रबुद्धे तर रंगभूषा उदयराज तांगडी यांची आहे अरविंद घोसाळकर व प्रसाद सावर्डेकर यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे