‘वाय’चा विशेष शो आयोजित करून थिएटरमध्येच केला मुलीचा नामकरण विधी, नाव ठेवले ‘मुक्ता’
एखादा सामाजिक विषय असलेला चित्रपट प्रदर्शित व्हावा आणि त्याचे सकारात्मक पडसाद उमटावेत, याहून आनंदाची गोष्ट असूच शकत नाही. ज्या हेतूने चित्रपटाची निर्मिती केली आहे, तो उद्देश साध्य होणे, हे एखाद्या नामांकित पुरस्कारापेक्षाही मोठे आहे आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे अजित वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ हा हायपरलिंक चित्रपट. स्त्री भ्रूण हत्या या गंभीर विषयावर भाष्य करणाऱ्या ‘वाय’ने अनेक स्त्रियांना या संवेदनशील विषयावर पुढे येऊन बोलण्यास प्रोत्साहन दिले. अनेक महिला प्रेक्षकांनी आपले अनुभव ‘वाय’च्या टीमसोबत शेअर केले. अशा प्रतिक्रिया येत असतानाच आता कोल्हापूरमधील सई राजेशिर्के देशमाने आणि मनोज देशमाने या जोडप्याने या चित्रपटाने प्रेरित होऊन आगळयावेगळया पद्धतीने आपल्या मुलीच्या नामकरण विधी करण्याचे ठरवून त्यानिमित्ताने त्यांनी ‘वाय’चा एक खास शो कोल्हापूरमध्ये आयोजित केला होता.
या शोच्या दरम्यान थिएटरमध्येच त्यांनी नामकरण विधीही घडवून आणला. मोठमोठे हॉल घेऊन थाटामाटात मोठा समारंभ साजऱ्या करणाऱ्या युगात एखाद्या थिएटरमध्ये आपल्या मुलीचे बारसे करणे आणि ‘वाय’ सारखा चित्रपट यावेळी दाखवून मौल्यवान संदेश समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न करणे, हा नक्कीच कौतुकास्पद प्रयोग आहे. विशेष बाब म्हणजे या वेळी देशमाने जोडप्याने आपल्या मुलीचे नाव ‘मुक्ता’ ठेवले. एखाद्या चित्रपटाने प्रभावित होऊन, हा विषय जास्तीसजास्त लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी बारशाचे असे आयोजन करणे, हे असे बहुदा पहिल्यांदाच घडले असावे. हा विषय असा आहे की, तो घराघरात पोचणे खूप गरजेचे आहे. याचे गांभीर्य कळले तरच याबाबत जागरूकता निर्माण होऊ शकते आणि या जोडप्याचा नामकरण विधीच्या निमित्ताने हा विषय लोकांपर्यंत पोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे.