‘हे’ नाटक निळू फुले यांनी केले अजरामर !!!
‘कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाट्यातून निळू फुले यांनी मराठी नाट्यसृष्टीत तर ‘एक गाव बारा भानगडी’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर निळू फुलेंनी तब्बल ४० वर्षे मराठी नाट्य व रंगभूमीवर काम केले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक दर्जेदार असे सिनेमे, नाटके प्रेक्षकांना दिली. ‘चोरीचा मामला’, ‘पुढचं पाऊल’, ‘शापित’, ‘सामना’, ‘सिंहासन’ या सिनेमांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या तर ‘जंगली कबुतर’, बेबी’, ‘सखाराम बाईंडर’ ही त्यांची गाजलेली नाटके होय. ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक निळू फुलेंनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर अजरामर केले. विजय तेंडूलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित ‘सखाराम बाईंडर’ या नाटकाला त्या काळी मराठी रंगभूमीवर प्रखर विरोध झाला. या नाटकाचे लेखक विजय तेंडुलकर यांना वाईला खराखुरा बाईंडर भेटला. त्याने ठेवलेली बाई ही खानावळ चालवत असे.

          सखारामच्या बोलण्याचा अंदाज नजरेसमोर ठेवूनच विजय तेंडुलकरांनी सखाराम बाईंडर या नाटकाची कथा एका रात्रीत लिहून काढली. एकदा तेंडुलकरांनी गप्पांच्या ओघात सखाराम बाईंडरची कथा डॉ. श्रीराम लागूंना सांगितली. नाटकाची कथा लिहून झाल्यावर या नाटकात डॉ. लागू किंवा काशिनाथ घाणेकर यांनी काम करावे अशी इच्छा तेंडुलकर व नाटकाचे दिग्दर्शक कमलाकर सारंग यांची होती. मात्र नाटकाचे प्रयोग आहेत असे सांगत डॉ. लागूंनी सखाराम बाईंडरसाठी नकार कळवला तर काशिनाथ घाणेकरांनी एका सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याचे सांगत नाटकाला नकार कळवला. त्यामुळे सखाराम कोण साकारणार हा प्रश्न तेंडुलकर व कमलाकर सारंग यांच्यापुढे उभा राहिला. अशातच निळू फुले यांनी साकारलेली ‘एक गाव बारा भानगडी’ चित्रपटातील ‘झेले अण्णा’ ही विनोदी खलनायकाची व्यक्तिरेखा खूपच गाजली होती. त्यामुळे ‘सखाराम’ साकारण्याची जबाबदारी निळू फुलेंवर आली.


या नाटकातील सखाराम हा लग्नसंस्थेवर व एकाच बाईसोबत आयुष्य काढता येते या गोष्टींवर अजिबातच विश्वास न ठेवणारा होता. सखाराम एका असहाय व अनाथ स्त्रीला घरी आणून तिच्यासोबत राहतो आणि त्याची एकत्र राहण्याची इच्छा मिटल्यावर तिला रीतसर साडीचोळी देत तिची रवानगी करतो. मानसिक गुंतवणूक न मानणाऱ्या सखारामच्या आयुष्यात ‘लक्ष्मी’ व ‘चंपा’ अशा दोन स्त्रिया येतात. त्यानंतर सुरुवात होते खऱ्या नाट्याला!२ फेब्रुवारी १९७२ रोजी शिवाजी मंदिरात चार वाजता ‘सखाराम बाईंडर’चा पहिला प्रयोग सादर करण्यात आला. सखाराम बाईंडरच्या भूमिकेत निळू फुले, लक्ष्मीची भूमिका कुसुम कुळकर्णी तर चंपाची भूमिका लालन सारंग यांनी साकारली होती. या नाटकातील एका प्रसंगात रंगमंचावर चंपा साडी बदलते. त्या काळातील प्रेक्षकांना हे सारं पचवणं जरा कठीणच गेले. मात्र निळू फुलेंचे संवाद सादरीकरण व अभिनयामुळे हे नाटकाला उत्तम प्रतिसाद मिळत होता.

       अशातच ‘या नाटकामुळे विवाह संस्था धोक्यात आली आहे आणि स्त्री-पुरुष या नात्याला एक वेगळंच वळण मिळालं आहे.’ अशी टीका या नाटकावर झाली. नाटकाच्या १३ व्या प्रयोगानंतर हे नाटक सेन्सॉरकडे गेलं. कमलाकर सारंग यांनी हार न मनात हायकोर्टात याचिका दाखल केली. या सर्वांमध्ये त्यांना त्यांची पत्नी व अभिनेत्री लालन सारंग यांची भक्कम साथ मिळाली. या नाटकाच्या खटल्यादरम्यान लालन व कमलाकर या दोघांनाही धमकीचे फोन येत होते. मात्र हे सर्व एवढ्यावरच थांबले नाही तर लालन यांच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवले गेले. आठ महिन्यांनी कोर्टाचा निकाल ‘बाईंडर’च्या बाजूने लागला. १९७३ रोजी ‘सखाराम बाईंडर’ पुन्हा रंगभूमीवर दाखल झाले. कोर्टात ‘बाईंडर’ विजयी ठरलं असला तरी त्याचा संघर्ष काही कमी झाला नव्हता. नाटक रंगभूमीवर दाखल झाल्यावर ‘शिवसेना’ या राजकीय पक्षाकडून नाटकाला प्रचंड विरोध झाला. त्यामुळे कमलाकर सारंग यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हे नाटक पाहण्याची विनंती केली. बाळासाहेबांनी नाटक पहिल्यावर त्यांना त्यात काहीच आक्षेपार्ह न आढळल्याने शिवसेनेचा नाटकाला असणारा विरोध मावळला.

त्यामुळे ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक पुन्हा रंगमंचावर जोमाने सादर होऊ लागले. त्यानंतर, निळू फुलेंनी साकारलेला ‘सखाराम बाईंडर’ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी नाट्यगृहात गर्दी केली. निळू फुलेंचा सखाराम इतका प्रभावी होता की सखाराम बाईंडर म्हणजेच निळू फुले हे समीकरण प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील.

Leave a Reply