‘आई कुठे काय करते’ मालिकेविषयीची ‘ही’ गोष्ट माहिती आहे का ?
गेल्या वर्षभरात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. मालिकेचे उत्तम कथानक, कथानकाची केलेली दर्जेदार मांडणी, प्रत्येक पात्राला दिलेले महत्त्व, प्रत्येक कलाकाराने त्यांच्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा केलेला प्रयत्न या सर्वांमुळेच मालिकेची बांधणी अगदी उत्तम झाली. मध्यंतरी या मालिकेत दाखवण्यात आलेल्या ट्विस्ट किंवा कथानकामुळे प्रेक्षक नाराज झाले होते. मात्र असे असले तरी या मालिकेची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. स्त्रिया व मालिका हा ट्रेंड जरी जुना असला तरीही या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेचे कथानक अरुंधती देशमुख या व्यक्तिरेखेभोवती फिरते. गेली २५ वर्षे या अरुंधतीने मुलांचे संगोपन, आई-अप्पांची सेवा, अनिरुद्धच्या कामाच्या वेळा, त्याचा राग-रुसवा, आवड-निवड असं सारं काही जपले आहे. मात्र तरीही तिला आई कुठे काय करते? असा प्रश्न विचारत कमी लेखले गेले. लग्नाच्या २५व्या वाढदिवशी समोर आलेल्या सत्याने अरुंधती हादरून जाते. मात्र त्यातही स्वतःला सावरत ती स्वतःच्या पायावर उभी राहते. अशा या सध्या, सोज्ज्वळ पण तितकीच कणखर असलेल्या अरुंधतीची कहाणी या मालिकेतून दाखवण्यात येते आहे. अरुंधती ही व्यक्तिरेखा मधुराणी गोखले-प्रभुलकर हीने साकारली आहे.
या मालिकेचे आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे या मालिकेचे एकाच वेळी सात भाषांमध्ये प्रक्षेपण होते आहे. मालिकाविश्वात हे पहिल्यांदाच घडत असून ही मूळ बंगाली मालिका आहे. ‘स्टार जलसा’ या बंगाली वाहिनीवर १९ जून २०१९ ला प्रदर्शित झालेली ‘श्रीमोयी’ ही मालिका आजतागायत सुरु आहे. या मालिकेचे लेखन प्रसिद्ध बंगाली लेखिका लीना गंगोपाध्याय यांनी केले आहे. लेखिका, दिग्दर्शिका व निर्मात्या असलेल्या लीना यांनी अनेक बंगाली लोकप्रिय मालिका लिहिल्या आहेत.
बंगालीशिवाय ‘आई कुठे काय करते’ ही मालिका ‘स्टार सुवर्णा’ या कन्नड वाहिनीवर ‘इन्थी निम्मा आशा’, एशियानेट या मल्ल्याळम वाहिनीवर ‘ कुडुंबविलक्कू’, स्टार माँ या तेलगू वाहिनीवर ‘इन्तिती गृहलक्ष्मी’, स्टार प्लस या हिंदी वाहिनीवर ‘अनुपमा’, स्टार विजय या तामिळ वाहिनीवर ‘बाकियालक्ष्मी’ या नावाने मालिका प्रक्षेपित होत आहेत. हिंदीतील ‘अनुपमा’ तर मराठीमधील ‘आई कुठे काय करते’मधील अनेक प्रसंग खूप गाजले. अनेक विषयांची मांडणी अगदी चांगल्या रीतीने केल्यामुळे ते प्रेक्षकांनाही आवडले. मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मात्र मालिकेची ही लोकप्रियता अशीच टिकून राहील का हे लवकरच कळेल.