फ्रायडे रिलीज : येत्या शुक्रवारी तयार राहा ‘झिम्मा’ खेळण्यास !
गेले दोन वर्ष कोरोना महामारीत काढल्यावर आता सर्वत्र सुरळीत होत चालले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आता नाट्यगृहे व चित्रपटगृहेही प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली आहे. अशातच हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ हा सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजेच १९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
वेगवेगळी पार्श्वभूमी, वेगवेगळ्या आवडी-निवडी व वयोगट असलेल्या स्त्रिया एका सहलीच्या निमित्ताने एकत्र येतात. त्यानंतर घडणारी धमाल, मजा मस्ती या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर हा सिनेमा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करेल यात शंका नाही. निर्मिती सावंत, सायली संजीव, सोनाली कुलकर्णी, सुहास जोशी, मृण्मयी गोडबोले, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर व सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.
क्षिती जोग, स्वाती खोपकर, अजिंक्य धमाल, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी सिनेमाची निर्मिती केली असून अमितराज यांनी संगीत सिनेमाला लाभले आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा हा सिनेमा प्रेक्षकांचे मन जिंकण्यात कितपत यशस्वी होतो हे लवकरच कळेल.