अभिनेता ओम भुतकर दिसणार ‘या’ ऐतिहासिक सिनेमात
‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा ओम भुतकर एका ऐतिहासिक सिनेमात पाहायला मिळणार आहे. शशिकांत पवार निर्मित व अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमात मोनालिसा बागल ही प्रमुख व्यक्तिरेखेत झळकणार असल्याची बातमी समोर आली होती.
मात्र सिनेमाच्या नायकाचे नाव हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम या सिनेमात ‘राव’ ही व्यक्तिरेखा तर मोनालिसा ‘रंभा’च्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळणार आहे. सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यांमध्ये दडलेली ‘रावरंभा’ ही अनोखी प्रेमकहाणी आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळेल.
प्रताप गंगावणे लिखित या सिनेमाचे चित्रीकरण सातारा येथे येत्या डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ओम व मोनालिसाची फ्रेश जोडी प्रेक्षकांना कितपत आपलंस करतेय हे लवकरच कळेल. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमात ओम भुतकरने राहुल्या ही भूमिका निभावली होती. त्याने साकारलेल्या या व्यक्तिरेखेचे सर्व स्तरावरून कौतुक झाले.
उर्दू भाषेवर प्रेम असल्याकारणाने ओम ‘सुखन’ नावाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करतो आहे. देशभरातल्या अनेक रसिक प्रेक्षकांकडून ‘सुखन’ भरभरून दाद मिळते आहे.