मन उडु उडु झालं मालिकेतील ‘दीपू’विषयी बरंच काही !

‘मन उडु उडु झालं’ मालिका सध्या तुफान गाजते आहे. दीपू व इंद्रा एकमेकांच्या प्रेमात कधी पडणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या मालिकेत ‘दीपू’ची भूमिका हृता दुर्गुळेने साकारली आहे तर इंद्राची व्यक्तिरेखा अजिंक्य राऊतने साकारली आहे. या नव्या व फ्रेश जोडीला प्रेक्षकांची पसंती लाभली आहे. आपल्या सुंदर हास्याने व दमदार अभिनयाने हृताने मराठी सिनेविश्वात स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे.

हृताचा जन्म २२ सप्टेंबर १९९४मध्ये मुंबईता झाला. हृताच्या आईचे नाव नीलिमा तर वडिलांचे नाव दिलीप असे आहे. ऋग्वेद असे तिच्या भावाचे नाव आहे. मूळची रत्नागिरीची असलेल्या हृताने माटुंगामधील रामनारायण रुईया महाविद्यालयातून अ‍ॅडव्हर्टायझिंगमध्ये पदवी घेतली आहे. हृताने स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेसाठी २०१२ मध्ये सहाय्यक दिग्दर्शकाचं काम पाहिलं होतं. त्यानंतर २०१३मध्ये स्टार प्रवाहवरील ‘दुर्वा’ मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. राजकारणावर आधारित असलेल्या या मालिकेत तिने दुर्वा ही महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेमुळे हृता घराघरात पोहोचली.

त्यानंतर २०१७ मध्ये झी युवावर प्रदर्शित झालेल्या ‘फुलपाखरू’ मालिकेत तिने वैदेही ही व्यक्तिरेखा साकारली. वैदेही व मानसच्या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली. प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या या मालिकेने हृताला खऱ्या अर्थाने ओळख दिली. आजही प्रेक्षक वैदेहीला विसरले नाहीत हेच हृताच यश आहे असे म्हणता येईल. २०१८मध्ये ‘दादा एक गुड न्यूज आहे’ असे म्हणत हृताने मराठी रंगभूमीवरही पदार्पण केले. हे नाटकाला जोरदार प्रसिद्धी मिळाली असून त्यातील तिचे नमिता हे पात्र विशेष गाजले. २०२०मध्ये ‘सिंगिंग स्टार’ या रिएलिटी शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही हृताने उत्तमरित्या पार पाडली.


सध्या अनेक मोठमोठ्या कंपन्यांची ब्रँड अँबेसेडर हृता आहे. ‘अनन्या’ या सिनेमातून हृता लवकरच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. ‘स्ट्रॉबेरी शेक’ नावाची एक शॉर्ट फिल्ममध्येही हृताने मृण्मयीची व्यक्तिरेखा साकारली आहे. तसेच ‘ड्युएट’ नावाच्या वेब सीरिजमध्येही हृता झळकली आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या हृताचे असंख्य चाहते आहेत. तुम्हाला हृता दुर्गुळेची कोणती व्यक्तिरेखा आवडते हे आम्हाला कमेंट करून सांगा.

Leave a Reply